NGN News
Latest Marathi News

नाशकात भाजपच ‘धुरंधर; ७२ जागांसह एकहाती सत्तेची पुनरावृत्ती

  • शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला ३० जागा; ‘मविआ’ची धूळधाण; दिग्गजांचा पराभव

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

२०१७ मध्ये नाशिकमध्ये एकहाती सत्ताप्राप्त केलेल्या भाजपने तब्बल आठ वर्षांनी त्याच अध्यायाची पुनरावृत्ती करत शानदार विजयाची नोंद केली. एकूण 31 प्रभागातील १२२ जागांसाठी गुरुवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत भाजपने ७२ जागी सफाईदार विजय प्राप्त केला. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीने अनुक्रमे २६ आणि ४ अशा ३० जागा राखत एकत्रितरित्या दुसरा क्रमांक राखला. शिवसेना ( उबाठा ) चा वारू केवळ १५ जागांपुरता धावला. कॉंग्रेसने ३, मनसेने १ तर इतर १ जागी अशा विजयाची नोंद झाली. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) ची पाटी कोरी राहिली. ‘शंभर प्लस’ जागांची भाजपची घोषणा मात्र हवेतच विरली. निवडणूक निकालात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीत सरासरी ५६.६७ टक्के मतदान झाल्याने सर्वच उमेदवारांमध्ये धाकधुक होती. शुक्रवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रथम पोस्टल मतांची गणना करण्यात आली. हळूहळू कल पुढे येत गेले. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. राज्यभरातील महापालिकांत जोरदार मुसंडी मारलेल्या भाजपची नाशिकमध्येही मुसंडी राहिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. निकाल घोषित झाल्यानंतर घोषणा देण्यात येवून गुलालाची उधळण करण्यात आली.

प्रमुख विजेते असे :

दिनकर पाटील, शाहू खैरे, सुधाकर बडगुजर, हिमगौरी आडके, सुरेश पाटील, स्वाती भामरे, गुरमित बग्गा ( भाजप ) अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, कैलास मुदलियार, राहुल दिवे, ( शिवसेना ), डॉ. हेमलता पाटील, ज्योती ठाकरे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), प्रथमेश गीते ( शिवसेना उबाठा )

दिग्गजांचा पराभव ..

अशोक मुर्तडक ( सेना पुरस्कृत अपक्ष ), योगेश हिरे, संभाजी मोरुस्कर, गणेश मोरे, दीपक बडगुजर, नुपूर सावजी, कल्पना चुंभळे, कैलास चुंभळे ( भाजप )

हायव्होल्टेज लढतीत मुकेश शहाणे विजयी

प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या लढतीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रभाग क्रमांक 25 मधून विजयी झालेले सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे. एबी फॉर्म वादामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मुकेश शहाणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. पक्षातून हकालपट्टी झाली असतानाही शहाणे यांनी थेट भाजपच्या अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांना पराभूत करत बाजी मारली, त्यामुळे हा निकाल भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपकडून जल्लोष..

दरम्यान, नाशिकमध्ये मिळवलेल्या एकहाती विजयाचा भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून जल्लोष करण्यात आला. पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा जयजयकार करण्यात आला.

नाशिकमधील पक्षीय बलाबल :
भाजप = ७२
शिवसेना = २६
राष्ट्रवादी = ४
शिवसेना (उबाठा )= १५
मनसे =१
काँग्रेस= ३
राष्ट्रवादी श.प = 0
इतर =१

Comments are closed.