मच्छिंद्र सानप उपमहापौर पदाचे असणार उमेदवार; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घोषणा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजपकडून आज महापौर-उपमहापौर पदांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, अपेक्षेनुरूप हिमगौरी आहेर -आडके ह्या महापौर तर मच्छिंद्र सानप हे उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवार राहतील. दोन्ही उमेदवारांना असलेली राजकीय पार्श्वभूमी आताच्या उमेदवारी प्राप्तीत महत्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.
नाशिक महापालिका महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी ( दि.६ ) पार पडणार असल्याने दोन्ही पदांसाठी मंगळवारी नाव निश्चिती होणे अपेक्षित होते. निवडणुकीत ६२ चा जादुई आकडा पार करणाऱ्या भाजपला सर्वाधिक ७२ जागा प्राप्त झाल्या. शिवसेनेला २६, शिवसेना ( उबाठा ) पक्षाला १५, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४, कॉंग्रेसला ३ आणि एक जागी अपक्षाची वर्णी लागली. भाजप स्वबळावर सत्तेत आल्यानंतर या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने राज्यात सत्तेत सोबत असलेल्या दोन्ही पक्षांना महापालिकेत मात्र सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच महापौर-उपमहापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले. मंगळवारी दुपारी मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहापौर पदाची नावे निश्चित करण्यासाठी भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर या पदांसाठी अनुक्रमे हिमगौरी आहेर -आडके आणि मच्छिंद्र सानप यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याकरिता आज अखेरचा दिवस असल्याने दोघांनी ती औपचारिकता पूर्ण केली.
राजकीय वारसा
भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार हिमगौरी आहेर -आडके ह्या प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आल्या आहेत. त्यांचे काका दिवंगत डॉ. दौलतराव आहेर हे मनोहर जोशी मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्यमंत्री होते, तर वडील डॉ. बाळासाहेब आहेर नाशिक महापालिका स्थायी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांचे चुलत बंधू डॉ. राहुल आहेर हे चांदवड-देवळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. स्वतः हिमगौरी आहेर -आडके ह्यांनी देखील नाशिक महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा वाहिलेली आहे.
दुसरीकडे उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप हे पंचवटी परिसरातून निवडून आले आहेत . नाशिक पूर्व चे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते सुपुत्र आहेत. मच्छिंद्र सानप यांची नगरसेवक म्हणून ही सलग दुसरी टर्म आहे.
विरोधकही सज्ज
महापालिका निवडणुकीत कमजोर मानल्या जाणाऱ्या शिवसेना ( उबाठा) सह शिवसेनेने महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या सीमा पवार यांनी शिवसेना ( उबाठा) च्या वतीने तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
Comments are closed.