ठाणे/एनजीएन नेटवर्क
पाच दिवसापूंर्वी नाशिक येथून निघालेला बिऱ्हाड मोर्चा आज शहापूरवरुन भिवंडीत दाखल झाला असून मोर्चेकऱ्यांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर तब्बल दोन तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी पञ हातात मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याची भूमिका या मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
नाशिक ते मुंबई मंत्रालय असा पायी बिऱ्हाड मोर्चा रोजंदारी शिक्षकांकडून काढण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करणे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. हजारोच्या संख्येने रोजंदारी शिक्षकांसह महिला लहान मुले मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. महाराष्ट्रातून आदिवासी शिक्षकांना कायमस्वरूपी वेतन देण्यात यावे, यासह कंत्राटी शिक्षक भरती विरोधात सर्व शिक्षक एकवटलेले असून रोजंदारी शिक्षक मुंबईच्या दिशेने शेकडोच्या संख्येत निघालेले आहे. हे शिक्षक आंदोलक आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, मानधनात वाढ व्हावी या मागण्यांना प्राधान्य देऊन पोलीस बंदोबस्तासह मुंबईकडे निघालेले आहेत.