मुंबई/एनजीएन नेटवर्क
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारीपट्टी लगतच्या भागातील दैनंदिन कामात व्यत्यय आणायला सुरुवात केली आहे. बिपरजॉयचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सौराष्ट्र आणि मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उंच लाटा आणि किनारी प्रदेशात जोरदार वारा वाहू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश झाला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व भागात गेल्या ६ जून रोजी सकाळी ५.३० वाजता बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. चक्रीवादळ सक्रीय होऊन सात दिवस झालेले आहेत आणि अजूनही ते किनारपट्टीला धडकलेले नाही. हे चक्रीवादळ १५ जूनला धडकणार असल्याने त्याचा एकूण कालावधी दहा दिवस होऊन ते सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ म्हणून नोंदले जाईल. याआधी २०१९ साली अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कार्यकाळ नऊ दिवस, १५ तास इतका होता. बिपरजॉय दहा दिवसांचा कालावधी पूर्ण करत असल्यामुळे ते सर्वाधिक टिकलेले चक्रीवादळ म्हणून गणले जाऊ शकते, अशी माहिती पीटीआयने दिली. जून महिन्यात गुजरात राज्याजवळ जाणारे २५ वर्षातील हे पहिलेच वादळ आहे. तर १८९१ पासून ते आतापर्यंत तीव्र चक्रीवादळ या श्रेणीत मोडणारे आजवरचे पाचवे वादळ असून या वादळाचा वेग ताशी ८८ ते ११७ किमी एवढा आहे.
बिपरजॉय वादळ अधिक विनाशकारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सौराष्ट्रला मागे टाकून हे वादळ गुरुवारी दुपारपर्यंत कच्छ आणि मांडवी तसेच गुजरातच्या जखाऊ बंदरावर धडकू शकते. वादळाच्या वाऱ्याचा वेग जास्तीत जास्त प्रतिताशी १२५ ते १३५ किमीपर्यंत वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय महापात्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, वादळाची हानिकारक क्षमता अधिक मोठी असू शकेल. चक्रीवादळ धडकल्यामुळे कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरच्या काही भागात १५ जून रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. चक्रीवादळाचा वेग हा धोक्याची घंटा असल्याची सूचना तज्ज्ञांनी दिली आहे.
समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान ३१ अंश सेल्सियस झाल्यामुळे आणि उच्चस्तरीय हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे श्रेणी एक मधील वादळ (चक्रीवादळाच्या ताकदीचे) असून चक्रीवादळाच्या निर्मितीला १२६ हून अधिक तास होऊन गेले आहेत. अरबी समुद्रातील आतापर्यंत श्रेणी एकमधील वादळे ही जास्तीत जास्त १२० तासापर्यंत सक्रीय राहिलेली आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियामधील जेजू राष्ट्रीय विद्यापीठातील टायफून रिसर्च सेंटरचे संशोधक विनित कुमार सिंह यांनी दिली.
मंगळवारी गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीकडे जात असताना अतितीव्र असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल. सौराष्ट्र-कच्छ भागात बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.