NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘मुक्त’ घोटाळ्याचा पर्दाफाश ! पॅथोलॉजी लॅबसाठी बोगस प्रमाणपत्र वाटप

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

विद्यापीठात प्रवेश न घेता  विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश न घेता चार जणांनी 20 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चारही संशयित नागपूर, कराड, अहमदनगर आणि मनमाड इथले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, पदवी, मेडिकल लॅब टेक्निशियन (एमएलटी) आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (डीएमएलटी) या अभ्यासक्रमाचे 20 विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या नावाने बनावट गुणपत्रक, पदवी, पदविका तसंच विद्यापीठाच्या बनावट नावासह पदवी पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र देण्यात आले होते. याच आधारे या संशयित विद्यार्थ्यांना पॅथालॉजी व्यवसाय सुरु करायचा होता. पॅथालॉजी नोंदणीसाठी मुंबई इथल्या महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे कागदपत्रे सादर करण्यात आली होती. यानंतर हि सर्व कागदपत्र पडताळणी करण्यासाठी मुक्त विद्यापीठाकडे सादर करण्यात आली. त्यावेळी विद्यापीठाच्या उत्तीर्ण यादीत संबंधित मुलांची नावे आढळली नाही. यानंतर पडताळणीत विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले.

समिती अहवालात सत्य उघड

2020 मध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पॅथालॉजी नोंदणीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात काही संशयास्पद बाबी दिसून आल्या. यानंतर सर्व कागदपत्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे पडताळणीसाठी पाठवीण्यात आले होते. विद्यापीठाच्या कुठल्याच यादीत विद्यार्थ्यांचे नाव नव्हते. याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध होऊन संबंधित संशयितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गौरव अनिलकुमार शिरसकर (रा. नागपूर), रमेश होनामोरे (रा. सातारा), अशोक ज्ञानदेव सोनवणे (रा. अहमदनगर) आणि संजय गोविंद नायर (रा. नांदगाव) या संशयितांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.