नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पक्षफुटीनंतर भाजपसोबत सत्तेमध्ये आलो, त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आपणास आग्रह करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे माध्यम संवादादरम्यान केला. खुद्द पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असा दावाही भुजबळ यांनी केला आहे.
विधिमंडळात मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी रान पेटवले होते. विरोधाची धार लक्षात घेवून मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता भुजबळ यांनी उपरोक्त दावा केला.
माझे राजकारण मुंबईतले …
भुजबळ म्हणाले, आम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये आलो. त्यावेळी अजितदादांनी अर्थ खाते स्वत:कडे घेतले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या, असा प्रस्ताव त्यांनी माझ्यापुढे ठेवला. आमच्यात चर्चादेखील झाली. अजित पवार यांनी कृषी खाते सांभाळा म्हणून मला खूप आग्रह केला. कृषी खाते चांगले आहे, ते तुम्ही घ्या म्हणून सूचना केली. तथापि, मी मुंबईत राजकारण केले असल्याने हे खाते ग्रामीण भागातील व्यक्तीला देण्याची सूचना मी केली. त्यानुसार, ते खाते माझ्याकडे आले नाही.
Comments are closed.