NGN News
Latest Marathi News

अंतरवाली सराटीमधील दगडफेक पूर्वनियोजित; पवारांचा आमदार बैठकीत..

मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप

नागपूर : एनजीएन न्यूज नेटवर्क

अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली, त्याचे नियोजन आदल्या रात्री झाले होते, असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला. त्या बैठकीला शरद पवार गटाचा एक आमदार उपस्थित होता, असा दावाही त्यांनी केला.

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यामध्ये अनेक महिला आणि लहान मुले जखमी झाली होती. त्यानंतर उपस्थित जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्याच घटनेवरून भुजबळांनी थेट पवारांवर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले, अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक झाली. त्याचे नियोजन आदल्या रात्री ठरले. त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहित असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले. निवडणूक आली तर जरागे उभा राहतो. त्यामुळे जो जो जरांगेला पाठिंबा देतो त्याला निवडणुकीत धडा शिकवा असे भुजबळ म्हणाले.

खाडाखोड करुन बोगस प्रमाणपत्र

कुणबी प्रमाणपत्र काढताना खाडाखोड करुन बोगस प्रमाणपत्र काढली जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला. खोटी प्रमाणपत्रं तपासण्यासाठी एक समिती नेमा अशी मागणी त्यांनी केली. फक्त शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र देणं हे कुठेही मान्य नाही. एका ताटात दोन जण जेवतात, त्यात तीन-चार जण आले तर कसं होईल? असा प्रश्न भुजबळांनी विचारला.

Comments are closed.