NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

आगामी सिंहस्थ निधीसाठी प्रकल्प अहवाल तयार करा : छगन भुजबळ

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करावी. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सन २०२६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्याकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील. नाशिक शहराच्या पायाभूत सुविधा करिता नाशिक महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो. यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही. विकासकामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची लवकरात लवकर घोषणा करावी. तसेच राज्य व केंद्रशासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही तातडीने व्हावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.