नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या अर्धशतकाच्या वाटचालीत समाजातील अन्यायाविरुद्ध वाचा फोडत असतानाच कोणत्याही चांगल्या कामाचे कौतुक करत एक आदर्श समाजरचनेला पुरस्कृत करण्याचे कार्य ‘भ्रमर’ वृत्तपत्राने सातत्याने केले. गेल्या पन्नास वर्षांत अनेक अडचणींवर मात करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कामदेखील आजही मोठ्या निष्ठेने भ्रमर करत आहे. इतकेच नव्हे तर आता ई-पेपरसारख्या माध्यमातून भ्रमर तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी केले.
सावानाच्या प. सा. नाट्यगृहात दैनिक भ्रमरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून ना. डॉ. पवार बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, प्रसिद्ध अभिनेते संदीप साकोरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. भारती पवार म्हणाल्या की, ज्या काळात कोणतेही आधुनिक तंत्रज्ञानच नव्हे, तर साधे फोनदेखील फारसे उपलब्ध नव्हते, त्या काळात भ्रमर दैनिकाचा अंक किती कष्टाने निघत असेल, याची कल्पना आपल्याला येते. विशेष म्हणजे आधी पाक्षिक, मग साप्ताहिक आणि गेल्या 50 वर्षांपासून सातत्याने सायंदैनिक म्हणून भ्रमरची वाटचाल अत्यंत जिद्दीने सुरू आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे रचनात्मक कार्य अर्धशतकापासून या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू आहे. मी याबद्दल चंदुलाल भाऊ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.
आजच्या काळात अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम निघाले आहेत, परंतु कोणतेही प्रोफेशनल कोर्स वगैरे न करता व्यवसायाला जी धार आणि कौशल्य लागते, ती कायम ठेवण्याचे कार्य या दैनिकाच्या माध्यमातून झाले आहे, असे स्पष्ट करताना डॉ. पवार यांनी 17 व्या शतकातील राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तत्कालीन सामाजिक कार्याचे अनेक दाखले दिले. जुन्या काळातील लोकांकडे मुळातच कौशल्य होते, त्यामुळेच ते कोणत्याही क्षेत्रात उत्तम काम उभे करू शकत होते. चंदुलाल शाह यांनी आजच्या काळात पत्रकारितेत आदर्श काम उभे केले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, गेल्या 50 वर्षांत अनेक वृत्तपत्र निघाले, काही पुढे गेली, तर काही बंद पडली. परंतु भ्रमरने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी दहावी-बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी भ्रमरची अक्षरशः आतुरतेने वाट पाहत असत. मीसुद्धा माझा दहावीचा निकाल हा ’भ्रमर’मधूनच सर्वप्रथम बघितला, तेव्हापासून भ्रमरविषयी माझ्या मनात एक वेगळे नाते व प्रेम निर्माण झाले आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून, जागृतपणे व निर्भीडपणे समाजाची भूमिका पत्रकारांनी मांडली पाहिजे. सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करतानाच, सरकार जर कुठे चुकत असेल, तर त्यावर बोट ठेवण्याचे कार्य केले पाहिजे, भ्रमरने हे कार्य निष्ठेने जोपासले असून निःपक्ष व निर्भीडपणे आपले कार्य केले म्हणून भ्रमर गेल्या पन्नास वर्षांपासून टिकून आहे, असे सांगून त्यांनी माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ए. टी. पवार आणि चंदुलाल शाह यांच्या मैत्रीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
सध्याच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा तंत्रज्ञानाच पुरस्कार करतात. सर्व मंत्रालयात त्याचा वापर वाढावा म्हणून प्रयत्न करण्याचे सांगतात. लोकशाहीत पत्रकारिता मोठ्या ताकदीने चालविण्याची गरज आहे. जगात प्रगतिशील भारताचे आपण स्वप्न बघतो, त्या वाटचालीत सामाजिक परिवर्तनामध्ये पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे, परंतु पत्रकारांना त्यांचे काम करू द्यावे, मात्र सध्याच्या काळात जे पत्रकार नाहीत, तेदेखील उगीचच या क्षेत्रात असल्याचा आभास निर्माण करत आहेत, ही वाईट गोष्ट आहे, असे सांगून त्यांनी या प्रवृत्तीवर बोट ठेवले.
’कसम, कलम आणि कदम’ हे विचारपूर्वक निवडायचे असतात, चंदुलाल भाऊ यांनी पन्नास वर्षांपूर्वी ’कलम’ विचारपूर्वक हाताळला. सामाजिक बांधिलकीची ’कसम’ घेऊन त्यांनी आस्ते कदम भ्रमरची वाटचाल सुरू ठेवली, असा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. पवार यांनी आपल्या भाषणात शेवटी केला.
यावेळी विशेष पोलीस महासंचालक डॉ. बी. जी. शेखर म्हणाले की, मी सन 1998 मध्ये नाशिक जिल्ह्यात आलो, तेव्हापासून माझा व भ्रमरचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे. भ्रमर म्हणजे मध्यरात्रीपासून दिवस उजाडल्यावर काय घडले, याच्या ताज्या बातम्यांचा खजिना आहे. पोलीस खाते आणि भ्रमरचे एक वेगळे नाते आहे. गुन्हेगारी उघड करणारे अधिकारी असो की, चांगले काम करणारे पोलीस कर्मचारी त्यांचे नेहमीच कौतुक करण्याचे काम भ्रमर करत असते. जेव्हा टीव्ही किंवा मोबाईल काहीही नव्हते, त्या जमान्यात भ्रमरने लोकांना अपडेट बातम्या देण्याचे काम केले, असे सांगून त्यांनी मराठ्यांच्या इतिहास काळातील काही उदाहरणे दिली. तसेच आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
चंदुलाल शाह हे पत्रकारिता करत असताना निरीक्षणगृहाच्या माध्यमातून बालके व मुलांसाठी मोठे सामाजिक कार्य करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. भ्रमर म्हणजे भुंगा ज्याप्रमाणे फुलावरील मध गोळा करण्याचे कार्य करतो, तसेच समाजातील चांगल्या घटना – घडामोडी समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य भ्रमर करीत आहे, असे सांगून जनतेचे ज्ञान वाढविण्याचे आणि समाजप्रबोधन करण्याचे कार्य भ्रमर करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. शेखर यांनी केला.
अभिनेते संदीप साकोरे यांनी सांगितले की, भ्रमर परिवाराने आज माझ्यासारख्या छोट्या कलाकाराचा मोठा सन्मान केला. भ्रमरच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील घडामोडी समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य 50 वर्षांपासून केले जात आहे. विशेष म्हणजे खेळाडू व कलावंत यांना प्रोत्साहन देण्याचे कामही भ्रमर करत आहे, असे सांगून साकोरे यांनी ’जीवन हे जगण्यासाठी असते… ’ या आशयाची एक समर्पक कविता सादर केली. तसेच भ्रमर हे एक विद्यापीठच असल्याचा उल्लेख केला.
लक्ष्मण सावजी यांनीही आपल्या मनोगतात दैनिक भ्रमरच्या आतापर्यंतच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ज्या काळात वर्तमानपत्राशिवाय कोणतीही बातमी किंवा घटना – घडामोड माहीत होत नव्हती, त्या काळात भ्रमरने नाशिकमध्ये मोलाचे कार्य केले, असे सांगून त्यांनी नाशिक शहरातील गेल्या 50 वर्षांतील राजकीय, सामाजिक आणि वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी सांगितले की, भ्रमरच्या पहिल्या दिवसापासूनचा मी साक्षीदार आहे. कालौघात अनेक साप्ताहिके, दैनिके व सायंदैनिके बंद पडली, परंतु गेल्या पन्नास वर्षांत अनेक संकटांवर मात करीत आपली स्वातंत्र्यपूर्ण वाटचाल भ्रमरने सुरू ठेवली आहे. प्रचंड जिद्द व खूप कष्ट करण्याची तयारी यातून हे शक्य झाले. चंदुलाल शाह यांनी खूप मित्र जोडले, त्या काळात त्यांच्या दैनिकाचे कार्यालय म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर चर्चा करण्याची जणू काही गावची चावडी होती. अनेक विधायक कामाचे निर्णय तेथे होत असत. किंबहुना भ्रमर केवळ वर्तमानपत्र नव्हते, तर गावचे चांगल्या कामाचे निर्णय घेण्याचे एक मध्यवर्ती केंद्र होते. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य भ्रमरने केले. तसेच पोलीस अधिकार्यांच्या चांगल्या कामाबद्दल कौतुकाची थाप देण्याचे काम चंदुलाल शाह यांनी केले, असेही भटेवरा म्हणाले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांनी भ्रमरच्या 50 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यात आपल्याला मित्रांनी मोठी मदत केली, असे सांगून त्यांनी सुरेश भटेवरा, प्रमोद भार्गवे, प्रकाश अकोलकर, प्रकाश जोशी, सुरेश अवधूत, मुक्तेश्वर मनशेट्टीवार, मधुकर बुरकुले, रमेश वणकर यांच्यासह अनेक स्नेहीजनांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
त्याचप्रमाणे सुवर्णमहोत्सवी वर्षात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. निबंध स्पर्धेसाठी 17 हजारांहून अधिक निबंध आले, तर चित्रकला स्पर्धेत 25 हजारांहून अधिक मुलांनी चित्रे काढली, तसेच वादविवाद स्पर्धेलादेखील उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा गांधी विद्यामंदिर, मानवधन शिक्षण संस्था, गं. पा. माने, साहित्यिक शंकर बोर्हाडेे, प्राचार्य हरीश आडके आदींचे सहकार्य लाभले, असेही चंदुलाल शाह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व घेतलेल्या सर्व उद्योजक, संस्था – संघटनांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भारतीताई पवार यांचा सत्कार सौ. प्रतिभा शाह यांनी केला, तसेच प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जतिंदर चिकी, प्रदीप भोर, धनपत अग्रवाल, हितेश शाह यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले. सी.ए.लोकेश पारख यांनी यावेळी कविता सादर केली तर डॉ. कैलास कमोद यांनी आभारप्रदर्शन केले.
….
गोदामाईची पत्रवारी
@ कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी व कलाकार दत्तात्रय कोठावदे यांनी ‘गोदामाईची पत्रवारी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण करून मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कोठावदे यांनी सुंदर व आकर्षक वेशभूषा करून प्रेक्षकांमधून व्यासपीठावर येत, गोदामाईने जणू काही भ्रमरच्या संपादकांना पत्र लिहिले आहे आणि भ्रमरच्या वाटचालीचा गौरवपूर्ण इतिहास गोदामाई सांगत आहे, असे सुंदर विवेचन केले. तसेच व्यासपीठावरून हे भावनिक पत्र वाचून दाखवत, नंतर ते पत्र भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह यांना सादर केले, तेव्हा व्यासपीठावरील मान्यवर व संपूर्ण सभागृहातील उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
…
[विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ]
सायंकाळी पावसाची रिमझिम सुरू असतानाही तसेच रविवार सारखा सुट्टीचा दिवस असतानाही भ्रमरच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उद्योग – व्यवसाय, पत्रकारिता या सर्व क्षेत्रांतील मान्यवर यांनी मोठी गर्दी केली होती. संपादक चंदुलाल शाह, अॅड. चैतन्य शाह, हितेश शाह आणि भ्रमर परिवारातील सर्व प्रतिनिधी व कर्मचार्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.