** पुष्कर भन्साळी
चांदोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क
भावाबहिणींच्या प्रेमाच्या बंधनाचा सण भाऊबीज यंदा सायखेडा पोलिस ठाण्यात एक आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजरक्षक पोलिस बांधवांना गावातील ११ महिलांनी औक्षण करून सन्मानित केले. आपुलकी, आदर आणि स्नेहभावाने रंगलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे.
या उपक्रमाची संकल्पना आमचे प्रतिनिधी पुष्कर भन्साळी यांनी मांडली होती. कार्यक्रमाचे आयोजन सायखेडा पोलिस ठाण्यात आनंदी वातावरणात पार पडले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आढाँगळे, तसेच पोलीस कर्मचारी अजय नाईक, सुनील तुंगार, प्रदीप भाबड, संतोष माळोदे, मिलिंद शिरसाठ, दीपक सानप आणि महिला पोलिस शिपाई सुनिता बोडके उपस्थित होते.
भाऊबीज साजरी करणाऱ्या बहिणींमध्ये संगीता काळे, सोनाली काळे, राणी सूर्यवंशी, कल्पना सावंत, कविता भनसाळी, कीर्ती जोशी, योगिता खैरनार, अश्विनी मटकरी, आशा दायमा, सुमन भनसाळी आदींचा सहभाग होता.
भावनिक वातावरणात बहिणींनी पोलिस भावांचे औक्षण केले, ओवाळणी करून त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. पोलिस बांधवांनीही बहिणींना भेटवस्तू देत त्यांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची ग्वाही दिली. या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले आहे.
“पोलिस हे खरे समाजाचे रक्षक असून तेच आमचे भाऊ आहेत. म्हणून यंदा आम्ही भाऊबीज पोलिस ठाण्यात साजरी केली,” असे उपस्थित महिलांनी सांगितले. सायखेडा पोलिस ठाण्यात झालेल्या या भावनिक कार्यक्रमाने भाऊबीज सणाचे खरे सार बंधुभाव, आपुलकी आणि समाजसेवेचे नाते नव्याने उजाळले आहे.
Comments are closed.