भुवनेश्वर/एनजीएन नेटवर्क
भरतनाट्यमचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करत असतानाच ते मंचावर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेमुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मलेशियातील आघाडीचे भरतनाट्यम वादक श्री गणेशन शुक्रवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांना शहरातील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्री गणेशन हे मलेशियाचे नागरिक होते. ते क्वालालंपूर येथील श्री गणेशालयाचे संचालकही होते. गणेशन भुवनेश्वरमधील भांजा कला मंडपात तीन दिवसीय देवदासी नृत्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमातही त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. शुक्रवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता.
60 वर्षीय श्री गणेशन यांनी दिवा लावत असताना नृत्य सादर केलं आणि नंतर ते स्टेजवर अचानकच कोसळले. त्याला तातडीने भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कॅपिटल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की श्री गणेशन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा.