नाशिक/एनजीएन नेटवर्क
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गतवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारोप कार्यक्रमानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट, 2023 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत सर्वांनी या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा.
नागरिकांना ध्वज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच ज्या संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना अधिक प्रमाणात तिरंगा ध्वज हवे असल्यास त्यांनी आपली मागणी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयात नोंदवावी.
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबवितांना प्रत्येक नागरिकाने ध्वज संहितेचे पालन करावे, तिरंगा ध्वज फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत फडकलेला असेल, दररोज सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयांनी ध्वज संहिता पाळावी. या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकांने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. अभियान कालावधी नंतर झेंडा सन्मानाने जतन करुन ठेवावा, अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने घरोघरी तिरंगा अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.