मुंबई/एनजीएन नेटवर्क
आगामी निवडणुकांत राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा, असे निर्देश देताना आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, अशी सूचनावजा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या मंत्र्यांना दिला.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शासकीय निवासस्थान पर्णकुटी इथे बुधवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या बैठकीला फडणवीस, बावनकुळे यांच्यासह भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.
‘मिशन 45’ पूर्ण करायचेय
फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देत काही आदेशही दिले. कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारा, असे फडणवीस म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असं त्यांनी म्हटलं. तसंच तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा. जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना दिला.