पुणे/एनजीएन नेटवर्क
पुण्यातील टिफिन पार्टी दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा राजकीय दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अलिखित करार झाला होता, असे बावनकुळे म्हणाले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे आदित्यच्या प्रेमात होते आणि त्यांचा अलिखित करारनामा झाला होता. 2019 ते 2024 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि नेत्यांनी मिळून शिवसेना कमी करायची, शिवसेनेचे आमदार कमी करायचे, अशी छुपी युती आणि सहमती उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिली होती. राष्ट्रवादीचे 100 आमदार करायचे आणि आपले आमदार कमी करायचे. 2024 मध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करायचे, हा अजेंडा ठरला होता, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. शिवसेना आमदारांना कळाले तेव्हा पराभव होऊ नये म्हणून ते बाहेर पडले. आपण निवडून येऊ का नाही, ही भीती शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे असताना होती. या भीतीमुळे हे सत्तापरिवर्तन झाले, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.