- बसवंत मधमाशी उद्यानात प्राचार्य, मुख्याध्यापक परिषदेचे आयोजन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
बसवंत गार्डनमध्ये विविध पर्यावरणपूरक, उद्योगस्नेही तसेच समाजाभिमुख उपक्रम सुरू असतात. हा आदर्श घेऊन दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वेसारख्या देशातही या प्रकारचा प्रकल्प उभारण्यात यावा, यातून त्याचे महत्त्व अधोरेखित होते, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.श्री. नितीन ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून जागृती व्हावी, यादृष्टीने दि. 21 ते 30 ऑगस्ट दरम्यान पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी पालन आणि प्रशिक्षण केंद्रात आयोजित मुख्याध्यापक/ प्राचार्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, हा प्रयोग आपल्या जिल्ह्यासाठी गौरवास्पद असून, कमी कालावधीत त्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. देशातील पहिले अॅपि- अॅग्री टुरिझम सेंटर होण्याचा मान त्यास मिळाला आहे. येथील पर्यटन हे शिक्षणपूरक तसेच निसर्गाभिमुख असून येथील क्षेत्रभेट विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योजकांना दिशादर्शक असल्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच कृषी शिक्षण संस्थांनी येथे सहली आयोजित कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
‘ग्रीनझोन अॅग्रोकेम’चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड यांनी प्रास्ताविक करून निमंत्रितांची ओळख करून दिली. यावेळी व्यासपीठावर पिंपळगाव बसवंत येथील श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष श्री. भास्करराव बनकर, म.वि.प्र.चे उपाध्यक्ष श्री. विश्वासराव मोरे, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ तथा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी.बी. पवार, नामवंत सनदी लेखापाल श्री. राजाराम बस्ते, म.वि.प्र.चे श्री. अशोक पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
द्राक्षनगरी पिंपळगाव बसवंत येथे ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण कृषी- मधमाशी औद्योगिक पर्यटन प्रकल्पामुळे पिंपळगाव बसवंत गावाचा गौरव होत आहे, असे श्री. भास्करराव बनकर यांनी आवर्जून नमूद केले. कृषि-ग्रामविकासाला पूरक ठरणार्या या प्रकल्पाची माहिती महाराष्ट्रातील मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांना मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, अशी यामागील भूमिका असल्याचे प्रतिपादन ‘ग्रीनझोन’चे कार्यकारी संचालक श्री. संजय पवार यांनी केले.
दहा दिवस चालणार्या या परिषदेत पहिल्या दिवशी नाशिक जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील विविध शैक्षणिक संस्थांमधील 70 हून अधिक प्राचार्य आणि मुख्याध्यापक सहभागी झाले होते. ‘ग्रीनझोन’चे संचालक श्री. विजय पवार, श्री. महेश पाटील, बसवंत गार्डनचे प्रकल्प संचालक श्री. संदीप वाघ, ‘पूर्वा केमटेक’चे महाव्यवस्थापक श्री. सुनील पाटील, श्री. संदीप सोनवणे, श्री. नितीन कराळे, श्री. सचिन पवार, श्री. संकेत अहिरे यांसह परिसरातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. संदीप वाघ यांनी मानले तर सूत्रसंचालन मेघा काशीद यांनी केले.
Comments are closed.