उज्जैन/एनजीएन नेटवर्क
बँक व्यवस्थापकाच्या पत्नीने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये घडली आहे. महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातले लोक इमारतीखाली जमा झाले, यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे. आपल्यासाठी हे पाऊल उचलणे सोपे नव्हते, असे तिने चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. उज्जैनच्या नीलगंगा भागात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
या भागातली सगळ्यात उंच बिल्डिंग असलेल्या शिवांश एलिगेन्सच्या बी ब्लॉकच्या सहाव्या मजल्यावरून 30 वर्षांच्या महिलेने उडी मारली. महिला डोक्यावर पडल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना घरात चिठ्ठी मिळाली. कौटुंबिक वादामुळे महिलेने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच पुढची माहिती समोर येईल.
प्राप्त माहितीनुसार महिलेचं माहेर इंदूरच्या देपालपूरमधील हातोद आहे. महिलेचा पती उज्जैन जिल्ह्याच्या घट्टिया भागातील युको बँकेत मॅनेजर आहे. सहाव्या मजल्यावरून उडी मारलेली शिल्पा खासगी नोकरी करत होती. घटनेनंतर महिलेच्या माहेरची माणसंही घटनास्थळी पोहोचली. महिलेच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. ‘माझ्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं. खूप प्रयत्न केला, तुम्हाला यामध्ये कुटुंबाला आणायची गरज नव्हती. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. तुम्हाला माझ्याबद्दल असेल तर मला माफ करा, मिस यू, शिल्पा….’ असं या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.