पुणे : बजाज ग्रुपतर्फे समाजोपयोगी उपक्रमांसाठी पुढील पाच वर्षांत रु.५,००० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘बजाज बियाँड’ या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) आणि धर्मादाय कार्यक्रमांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रुपच्या नव्या विभागांतर्गत कौशल्य विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळातील २ कोटींहून अधिक तरुणांचा फायदा होणार आहे आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगार व उद्योग संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात येणार आहे.
बजाज समुहाच्या उद्योगांमध्ये आणि त्यांच्या समाजसेवी प्रयत्नांमध्ये पिढ्यानपिढ्या सामाजिक जबाबदारीचे भान रुजलेले आहे. गेल्या फक्त १० वर्षांच्या कालावधीत, बजाज ग्रुपने सीएसआर उपक्रमांसाठी सुमारे रु.४,००० कोटींचे योगदान दिले आहे. या बहुतेक उपक्रमांचा भर कौशल्य व शिक्षण, आरोग्य, उपजीविका, जलसंवर्धन आणि विकासाच्या इतर क्षेत्रांवर होता.
बजाज ग्रुपतर्फे विविध संस्थांच्या माध्यमातून मानवतावादी उपक्रम राबविण्यात येतात. यात जमनालाल बजाज फाउंडेशन, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, कमलनयन बजाज हॉस्पिटल इत्यादी संस्थांचा समावेश आहे. या संस्था समुदायांच्या उन्नतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अविरतपणे काम करत आहेत. सर्व भारतीयांसाठी भरभराटीच्या आणि सर्वसमावेशक भविष्याची सहनिर्मिती करण्याचा या ग्रुपचा निर्धार आहे.
बजाज ग्रुपचे प्रमुख सीएसआर उपक्रम :
- बजाज इंजिनीअरिंग स्कील्स ट्रेनिंग (BEST) कार्यक्रम २०२३ मध्ये सुरू करण्यात आला. इंडस्ट्री ४.०शी संबंधित असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानात इंजिनीअरिंग व डिप्लोमा पदवीधरांचे कौशल्य विकसित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या फ्लॅगशिप केंद्राचे यशस्वी उद्घाटन पुण्यात झाले आणि या केंद्रात १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. भारतभरात १५ केंद्रांची स्थापना करून या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याची योजना आहे.
- बजाज फिनसर्व्ह लिमिटेडच्या बँकिंग, फायनान्स व इन्श्युरन्सच्या (CPBFI) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्योगक्षेत्र आणि शिक्षण यात दुवा साधून कौशल्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे फायनान्शिअल सर्व्हिस म्हणजेच वित्तसेवा क्षेत्रातील रोजगार संधींचा फायदा घेण्यासाठी टिअर २ व टिअर ३ शहरांमधील तरुणांना सक्षम करण्यात येते. या संस्थेचे अस्तित्व १४० शहरांमध्ये असून CPBFI कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतभरातील ५३,००० नवपदवीधरांना प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि त्यांना याचा फायदा झाला आहे. बजाज फिनसर्व्हने नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या AICTEसोबत भागीदारी केली आहे.
- बजाज जलसंधारण प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील १६१ गावांमध्ये २०१५ मध्ये सुरू करण्यात आला. जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी या गावांमधील समुदायांना सक्षम करण्यात येते. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विदर्भातील भागांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, पाणी आणि स्वच्छतेसाठी रु. १४० कोटींहून अधिक निधीचे योगदान देण्यात आले.
- ‘हमारा सप्ना’ हा जमनालाल बजाज ट्रस्टचा उपक्रम २०१२ मध्ये सुरू करण्यात आला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या वंचित महिलांच्या आयुष्यामध्ये शिक्षण आणि उद्योगाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचा हा प्रयत्न आहे. नियमित विकास उपक्रमांमध्ये संवादकौशल्य, संगणक कौशल्य, कायद्याचे व सामाजिक ज्ञान, वित्त व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, स्वच्छता आणि योग यांचा समावेश आहे.
- या उपक्रमांवर प्रतिक्रिया देताना बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, “आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील तरुणांच्या सक्षमीकरणामध्ये परिवर्तनात्मक प्रभाव दिसून आला आहे. आज आम्ही ‘बजाज बियाँड’चे अनावरण करत आहोत. भविष्यातील पिढीला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करण्याचे आमचे मिशन आम्ही या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत.”