नाशिक/एनजीएन नेटवर्क
गौण खनिज प्रकरणात तक्रारदाराला बजावलेला सव्वाकोटी रुपयांचा दंड कमी करण्यासाठी 15 लाखांची लाच स्वीकारणाऱ्या तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या बहिरम यांनी स्वतःच्या कार्यालयाला देवू केलेले ‘अत्याधुनिकते‘चे स्वरूप आता चर्चेचा विषय बनला आहे. नरेशकुमार बहिरम यांनी गेल्या एप्रिल 2023 मध्ये नाशिक तहसीलदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. वास्तुशास्त्र प्रमाण मानत बहिरम यांनी आपल्या केबिन नुतनीकरणाचे काम काढत आपल्या वेगळेपणाची प्रचीती दिली होती. पश्चिमेकडे असलेल्या स्वतःच्या कॅबिनचे दार पूर्वेकडे करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यासाठी यंत्रणा कामाला लावून प्रत्यक्षात कार्यारंभ देखील केला. एव्हढ्यावर न थांबता खास बैठकींसाठी अँटी चेंबर, फर्निचर, रंगरंगोटी, पीओपी काम लगबगीत सुरु केल्याने तो अनेकांच्या आश्चर्याचा भाग बनला. एकीकडे कार्यालयीन खर्च कमी करण्याचे सरकारचे धोरण असताना बहिरम यांच्या दालनाच्या नुतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी कसा मंजूर झाला, याची खमंग चर्चा रंगली होती. अशातच बहिरम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने त्यांचे आणखी काही कारनामे आहेत का, यावरही परिसरात खल सुरु आहे.