NGN News
Latest Marathi News

बडगुजर माय-लेकाची प्रभाग क्र. २५ मधून माघार

  • दीपक बडगुजर २९ मध्ये मात्र लढणार; मुकेश शहाणे यांच्यासोबत रंगणार लढत

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

एकच प्रभागात भाजपच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म्स देण्याचा घोळ झाल्यामुळे चर्चेत आलेल्या नाशिकमधील प्रभाग क्र. २९ मधून उमेदवारी कायम ठेवत दीपक बडगुजर यांनी आई हर्षा बडगुजर यांच्यासह महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ मधून माघार घेतली आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बडगुजर माय-लेकाने हे पाऊल उचलल्याने भाजपमधील अंतर्गत वाद काही अंशी शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ क मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या हर्षा सुधाकर बडगुजर यांनी दीपक बडगुजर यांच्यापाठोपाठ आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या प्रभागात २५ मधुन क गटातून भाग्यश्री ढोमसे व ड मधुन प्रकाश अमृतकर यांना भाजप पुरस्कृत करण्यात आल्याची घोषणा सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. दुसरीकडे, दीपक बडगुजर २९ मध्ये अ गटातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून लढणार आहेत. तिथे त्यांची गाठ अपक्ष मुकेश शहाणे यांच्याशी पडणार आहे.

अपक्ष निवडणूक लढणार : शहाणे

 प्रभाग 29 मधील ‘अ’ गटासाठी दीपक बडगुजर व मुकेश शहाणे यांनी भाजपकडून एबी फॉर्म सादर केले होते. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बडगुजर यांचा एबी फॉर्म वैध ठरवला. तर शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवला. यानंतर आता  भाजपचे बंडखोर माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शहाणे म्हणाले, काही लोकांना घराणेशाही हवी आहे. घरातील सर्वांना उमेदवारी पाहिजे. मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. धनदांडग्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. जनेतच्या बळावर मी निवडणूक लढणार आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी समजूत काढूनही शहाणे यांनी उमेदवारीचा निर्णय कायम ठेवला आहे.

शिरसाठ-बिरारी भिडले ..

दरम्यान, महापालिका निवडणुकीत डावावल्या गेलेल्या भाजपच्या देवानंद बिरारी यांचा पक्षाचेच उमेदवार बाळकृष्ण शिरसाठ यांच्याशी मोठा वाद झाला. प्रारंभी शाब्दिक वाद झाल्यानंतर दोघे परस्परांवर धावून गेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला. पक्षाने तिकीट नाकारलेल्या बिरारी यांनी नंतर माघार घेतली.

Comments are closed.