NGN News
Latest Marathi News

गणेशोत्सवात घरगुती देखाव्यातून अपारंपारिक ऊर्जा संदर्भात जनजागृती

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महावितरणच्या पंचवटी उपविभाग, नाशिक अंतर्गत असलेल्या मेरी उपकेंद्राचे यंत्रचालक भूषण सोनोने यांनी जेल रोडवरील आपल्या निवासस्थानी बसविलेल्या गणरायांच्या समोर स्वतः उभारलेल्या देखाव्यातून अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत ही संकल्पना साकार केली असून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रकल्प हे भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचा संदेश त्यांनी देखाव्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करणे, प्रदूषण कमी करणे, पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देणे, आणि रोजगार निर्मिती वाढविणे या शासनाच्या मुख्य उद्देशाची जागृती करण्यासाठी हा देखावा करण्यात आलेला आहे. सौर, पवन, भू-औष्णिक ऊर्जा, बायोमास इत्यादींचा वापर करून हे प्रकल्प उभारले जातात, जे निसर्गावर आधारित व अक्षय असल्यामुळे पर्यावरणासाठी फायदेशीर आहेत.

गणरायांसमोर तयार केलेले या देखाव्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अपारंपरिक ऊर्जा कशा पद्धतीने तयार होते, सोलर पॅनल व पवनचक्की द्वारे उर्जा निर्मिती. तसेच बायो ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा या माध्यमातून करण्यात येणारी ऊर्जा निर्मिती या माध्यमातून दाखविण्यात आलेली आहे.

विविध पद्धतीने ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सर्वांपर्यंत पोहोचावे हा उद्देश देखाव्याचा असल्याचे श्री. भूषण सोनोने यांनी सांगितले. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे,अधीक्षक अभियंता राजेश थूल यांच्या प्रेरणेतून तसेच नाशिक शहर विभाग १चे कार्यकारी अभियंता चेतन वाडे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. किरण धनाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार केल्याचे सोनोने यांनी सांगितले.

Comments are closed.