- सर्वाधिक 85.66 टक्के मतदान त्र्यंबकेश्वर येथे; २१ डिसेंबर रोजी निकाल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेने पार पडले. प्रशासकीय माहितीनुसार, जिल्ह्यातील नगरपरिषदांसाठी सरासरी 68.34 टक्के मतदान झाले. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच केंद्रांवर मोठी रीघ लागलेली बघायला मिळाली. सर्वाधिक 85.66 टक्के मतदान त्र्यंबकेश्वर येथे झाले. येत्या २१ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येवून निकाल घोषित केला जाणार आहे.
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, मनमाड, भगूर, नांदगाव, सिन्नर, सटाणा, त्र्यंबकेश्वर , इगतपुरी, ओझर, चांदवड आणि येवला येथील नगरपरिषदांसाठी मतदान पार पडले. यासाठी एकूण ४१६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी इव्हीएम यंत्र बंद पडण्याच्या तर काही ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वृद्ध, दिव्यांग मतदारांना आणण्यासाठी विविध पक्षीय कार्यकर्ते धावपळ करताना दिसून आले. सकाळच्या सत्रातील सत्रानंतर मतदारांची संख्या रोडावलेली दिसली असली तरी दुपारी २ वाजेनंतर पुन्हा रांगा लागलेल्या दिसल्या. ओझर येथील एका केंद्रावर दोनदा इव्हीएम यंत्र बंद पडल्याने गोंधळ उडाला. त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर याठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. तथापि, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांतता निर्माण झाली.
सिन्नरला स्प्रे फवारल्याने तणाव
दरम्यान, सिन्नरला सायंकाळच्या सुमारास शिवसेना ( उबाठा ) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी एका युवकाने डोळ्यांची आग होणारा स्प्रे फवारल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे काही जणांना त्रास झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार किरण गोजरे यांच्या डोळ्यातही स्प्रे फवारल्याने कार्यकर्ते संतापले. दोन्ही पक्षांचे कार्कर्ते सामोसमोर आल्याने काही काल तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत सर्वाना शांत केल्याने पुढील अनर्थ टाळला.
एकूण 68.34 टक्के
– पिंपळगाव 73.21 टक्के
– मनमाड 63.61 टक्के
– भगूर 73.28 टक्के
– नांदगाव 60.28 टक्के
– सिन्नर 67.65 टक्के
– सटाणा 67.54 टक्के
– त्र्यंबकेश्वर 85.66 टक्के
– इगतपुरी 68.68 टक्के
– ओझर 62.31 टक्के
– चांदवड 74.52 टक्के
– येवला 73.91 टक्के
Comments are closed.