पुणे/एनजीएन नेटवर्क
राज्यात पावसाच्या पुनरागमनाची तारीख पुन्हा एकदा लांबली आहे. हवामान विभागाने यावर शिक्कामोर्तब करत राज्यात सध्या मान्सूनच्या पावसासाठी पूरक वातावरण नसल्याचे स्पष्ट केले. थोडक्यात ऑगस्ट महिन्यात तरी पाऊस अपेक्षाभंगच करताना दिसणार आहे. तर, सप्टेंबरमध्ये मात्र 7 तारखेनंतर तो राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगला जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तूर्तास महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरीसह ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. राज्यातील एकंदर पावसाचा अंदाज पाहता सध्याच्या घडीला बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची मात्र कोंडी होताना दिसत आहेत. जून महिन्यात वेगाने सुरु झालेल्या शेतीच्या बहुतांश कामांचा वेग आता मंदावला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. 1 सप्टेंबरनंतर राजस्थानातून पाऊस परतीची वाट धरणार असून, याचदरम्यान पुढील काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे पुन्हा एकदा नव्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होणार आहे. ज्यामुळं त्यादरम्यानच राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पाऊस गाजवणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.