NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

लासलगाव, पिंपळगाव, येवला, कळवणला शेतकऱ्यांचा एल्गार; लिलाव बंद..

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

तीन दिवसांच्या खंडानंतर सुरु झालेल्या कांदा लिलाव प्रक्रीयेत पहिल्याच दिवशी दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावसह पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण आदी ठिकाणी लिलाव बंद पाडले. चांदवडसह काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलनही केले. नाफेडने २४१० रुपये भाव जाहीर केला असला तरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष बाजारात खरेदी होत नसल्याचा आरोप लासलगाव येथे शेतकऱ्यांनी केला.

कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. दरावर नियंत्रण राखण्यासाठी सरकारकडून हे तंत्र अवलंबले गेल्याचे आरोप करत व्यापाऱ्यांनी तीन दिवस लिलाव बंद ठेवले होते. या काळात केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत दोन लाख क्विंटल कांदा खरेदीचा निर्णय घेतला. जिल्ह्यात १० केंद्र कार्यान्वित करीत खरेदी सुरू केल्याचे दावे झाले. निर्यात प्रक्रियेत अडकलेला कांदा विनाशुल्क पाठविण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्यानंतर कांदा व्यापारी संघटनेने लिलावात सहभागी होण्याचे मान्य केले होते. गुरुवारी जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. मात्र, अनेक ठिकाणी दर गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव बंद पाडून सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.  भाव घसरल्याने लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण आदी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. 

Leave A Reply

Your email address will not be published.