NGN News
Latest Marathi News

‘निमा’च्या अध्यक्षपदी आशिष नहार यांची बिनविरोध फेरनिवड

  • वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब; निवडीचे सर्वत्र स्वागत

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक इंडस्ट्रीज अँड मनुफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या औद्योगिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारणी निवडण्यासाठीची बैठक निमा हाऊस सातपूर येथे झाली आणि सर्वानुमते आशिष नहार यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

प्रारंभी निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी निमा सभासदांचे स्वागत करून आपल्या कार्यकर्दीचा वार्षिक आढावा बैठकीत सादर केला. निमाची सूत्रे फेब्रुवारी २०२५ मध्ये नव्या कार्यकारीणीकडे सुपूर्द झाल्यानंतर या टीमने नाशकात मेगा प्रोजेक्ट आणणे, सीपीआरआय लॅब कार्यान्वित करणे, नाशकात कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणे, निफाड तालुक्यात होऊ घातलेल्या डायपोर्टला गती मिळविणे, डिफेन्स हबची निर्मिती असा पंचसूत्री कार्यक्रम आखून त्याच्या पूर्णत्वासाठी आराखडा बनवला व त्यानुसार काम सुरू केले. या सर्व पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास नाशिक हे देशातील सर्वात मोठे औद्योगिकवाढीचे अव्वल डेस्टिनेशन ठरेल यात मुळीच शंका नाही, असा दावा आशिष नहार यांनी केला.

यावेळी मनोगतात निमाचे सर्व पदाधिकारी, सभासद, संलग्न औद्योगिक व व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधींना, विविध शासकीय विभागांना सोबत घेऊन उद्योजकांच्या व नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. सदर बैठकीत माजी अध्यक्ष विवेक गोगटे, रमेश वैश्य, डी जी जोशी, मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटणकर, संजीव नारंग, रवी वर्मा, मनिष कोठारींसह महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आदींसह अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Comments are closed.