NGN News
Latest Marathi News

कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट; हायकोर्ट निर्णयावर मंत्रिपदाचे भवितव्य

  • अंजली दिघोळे यांचा अर्ज न्यायालयाकडून ग्राह्य

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक उच्च न्यायालयाने मंगळवारी ( दि. १६) सदनिका घोटाळाप्रकरणात कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळे- राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.

दरम्यान, न्यायालयाचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासंदर्भात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत तातडीच्या सुनावणीची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 

Comments are closed.