NGN News
Latest Marathi News

गैरव्यवहार सिध्द; मालेगावमधील अंधशाळेवर संक्रांत..तुकाराम मुंढेंचा दणका

  • विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संख्या अव्वाच्या सव्वा दाखवून शासनाची लुट

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गैरव्यवहाराचे झालेले आरोप आणि त्याच्या सिद्धतेनंतर मालेगावमधील अंधशाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला आहे. मालेगाच्या रावळगाव नाका परिसरात अंध शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था नावाने हो शाळा सुरु होती. शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत दिव्यांग विभागाने दिलेल्या निकालावर मुंढे यांच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, या अंधशाळेत गैरव्यवहाराच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. शाळेत केवळ सात अंध विद्यार्थी असताना कागदोपत्री ही संख्या ५० इतकी दाखवण्यात आली. तसेच शिक्षक-शिक्षकेतर मिळून २४ अशी कर्मचारी संख्या दाखवून अनुदान आणि भत्ते यांमधून मोठी रक्कम वर्षानुवर्षे लाटण्यात आली. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने चौकशी समिती नेमली. समितीच्या चौकशीमध्ये तथ्य आढळून आले. अखेर अंधशाळेची मान्यता रद्द करण्याचा आधी दिव्यांग विभागाने आणि नंतर दिव्यांग कल्याण विभागाने निर्णय घेतला. संस्थाचालकांनी शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. दरम्यान, चौकशीअंती शाळेची मान्यता रद्द करण्याचा शासनाचा निर्णय समाधानकारक आहे, तथापि फसवणुकीतून लाटलेली रक्कम शासकीय तिजोरीत पडेपर्यंत आपण लढा देत राहू, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Comments are closed.