नाशिक/एनजीएन नेटवर्क
कायदेशीर ज्ञात स्त्रोतांपेक्षा ६४ टक्के अधिक म्हणजे जवळपास एक कोटींची मालमत्ता आढळून आल्याने महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे अपसंपदेचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता धनगर यांना गेल्या जूनमध्ये ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात धनगर यांच्याकडे ८५ लाखाची रोकड, ३२ तोळे सोन्याचे दागिने, सदनिका, भूखंडाची कागदपत्रे तसेच बँक खात्यात ३० लाखांहून अधिकची रक्कम सापडली होती. त्यानंतर धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू करण्यात आली. जून २०१० ते तीन जून २०२३ या कालावधीत शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या धनगर यांच्याकडे कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपयांची अपसंपदा त्यांनी जमवल्याचे उघड झाले. कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा ६४ टक्के अधिक मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. यावरून धनगर यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.