NGN News
Latest Marathi News

सटाण्यात आधी अतिक्रमणविरोधी मोहीमेची घोषणा, नंतर तलवार ‘म्यान’

  • नेमके पाणी कुठे मुरतेय, सर्वसामान्य नागरिकांकडून सवाल उपस्थित

** श्रीकांत रौंदळ

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरातील अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्याची गर्जना करणाऱ्या सटाणा नगर परिषदेला अखेर मोहीम स्थगित करण्याची नामुष्की आल्याने शहरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा केल्या जात आहेत. मोठ्या थाटामाटात जाहीर झालेली अतिक्रमण विरोधी मोहीम ऐनवेळी मागे घेतल्याने नेमके पाणी कुठे मुरते आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नगरपरिषदेकडून शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर व चौकांमधील वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई होणार असल्याची घोषणा पालिकेचे मुख्याधिकारी तथा परिविक्षाधीन अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांनी केली होती. यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र नियोजित दिवशीच नाशिक येथे जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक व पोलीस बंदोबस्ताची अनुप लब्धता हे कारण पुढे करत मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.

प्रशासनाकडून देण्यात आलेली कारणे नागरिकांना समाधानकारक वाटत नसल्याचे चर्चेवरून दिसून येत आहे. शहरातील वाहतूक कोंडी, पादचारी मार्गावरील अतिक्रमणे, फेरीवाल्यांचा वाढता पसारा, हुतात्मा स्मारक परिसरातील भाजीपाला विक्रेते यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरातील अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे होते मात्र ही मोहीम स्थगित केल्याने दबाव गटाचा प्रभाव तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. काही व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की अतिक्रमण हटविण्याची मोहीम केवळ घोषणांपुरती मर्यादित राहत आहे. मोहीम गुंडाळण्यामागे राजकीय भूमिका असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मोहीम पुढे ढकलली असली तरी ती कधी राबविण्यात येणार याबाबत स्पष्ट दिनांक जाहीर करण्याची मागणी होत आहे अन्यथा ही मोहीमही इतर घोषणांप्रमाणे कागदोपत्रीच राहणार का असा सवाल सटाणा शहरातील नागरिकांना पडला आहे.

रस्त्याची हद्द निश्चित करावी

शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या साक्री- शिर्डी रस्त्याची हद्द निश्चित करण्यात यावी यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे दिलेला प्रस्ताव दोन वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्याची दुतर्फा असलेली हद्द निश्चित केल्याशिवाय अतिक्रमण मोहीम राबविण्यात अडचणी येत असल्याचे पालिका प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा परिविक्षाधीन अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांनी जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची हद्द निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असे सूचित केले आहे.

Comments are closed.