नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
देशात जी २० परिषदेची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात जगभरातील प्रतिष्ठित नेते भारतात आले आहेत. परिषदेत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-मध्य-पूर्व-युरोप मेगा आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. या कॉरिडॉरमुळे जी २० परिषदेतील सहभागी देशांतर्गत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे. यावेळी मोदी यांनी फिजिकल पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आर्थिक पायाभूत सुविधेत अभूतपूर्व गुंतवणूक होत असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी मोदी म्हणाले, आज आपण सर्वांनी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार होताना पाहिला आहे. येणाऱ्या काळात भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात अर्थव्यवस्था इंटिग्रेशनचं प्रभावी माध्यम असेल. हा करार पूर्ण जगात कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देईल. या करारात भारत, UAE, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
@ मजबूत कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा मानवाच्या विकासाचा मूळ आधार आहेत. भारताने आपल्या विकासयात्रेत या विषयाला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे.फिजिकल पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आर्थिक पायाभूत सुविधेत अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत हो आहे. आम्ही ग्लोबल साऊथच्या अनेक देशात विश्वसनीय सहकाऱ्याच्या रुपात उर्जा, रेल्वे, पाणी, टेक्नोलॉजी पार्ट्ससारख्या क्षेत्रात प्रकल्प सुरू केले आहेत. ग्लोबल साऊथच्या देशात आम्ही पायाभूत सुविधेतील अंतर कमी करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान