राळेगण सिद्धी/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर ट्विटरवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अण्णा हजारे यांनी आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा हजारे यांचे कायदेशीर सल्लागार ॲड मिलिंद पवार यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. हजारे यांनी यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता अण्णा हजारे यांच्याकडून प्रत्यक्ष कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे. हजारे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या माहितीसाठी शरद पवारांनाही नोटीस पाठवली आहे. जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांनी खुलासा करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केलीय. जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार, असा इशारा अण्णा हजारे यांनी नोटीसद्वारे दिला आहे.