पुणे /एनजीएन नेटवर्क
पुण्यातील एका गणपती मंडळाच्या देखाव्याला आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा थोडक्यात वाचले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडवात आगीची घटना घडली. या मंडळाने महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. याच देखाव्याच्या कळसाला आग लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली अन् मोठी दुर्घटना टळली. गणपतीच्या स्टेजला आणि मंदिराप्रमाणे उभारलेल्या सजावटीला आग लागली. व्हिडीओमध्ये बाजूला फटाके फोडले गेल्याचं देखील दिसतंय. त्यामुळे फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.