मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यात कॅसिनोचा कायदा रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. यासोबत गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकाला एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा सरकारकडून पुरवण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. हा पाच हजार कोटीचा प्रस्ताव असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
राज्यातून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 1976 पासून राज्यात हे विधेयक अस्तित्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधायक रद्द करण्याची घोषणा केली होती. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी फेब्रवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती. आपल्या शेजारी राज्य असलेल्या गोवा, सिक्किम, मकाऊ, नेपाळमध्ये कॅसिनो गेमिंगला परवानगी असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाल्याचे पत्रात म्हटले होते. राज्यात कॅसिनो सुरू करावा यासाठी अनेक जण कोर्टात गेलेले आहेत. मात्र त्याआधीच राज्य सरकारने हा अधिनियम रद्द केला आहे.