नाशिक/एनजीएन नेटवर्क
मनसे कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अंगावर केसेस घेणे ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच मी त्यांचे अभिनंदन करायला खास नाशिकमध्ये आलो. प्रत्येकाने टोल फोडावा असे माझे म्हणणे नाही. मला वाटते हे सगळे प्रेमापोटी घडलंय, असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार अडवण्यात आली होती. तिथे टोल कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी वाद घातल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्यानंतर आज ठाकरे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नाशकात आले होते. अमित ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी शहरप्रमुख दिलीप दातीर, मनविसेचे शाम गोहाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
————————-
@ पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी अंगावर केसेस घेतल्या आहेत. त्यामुळे मला वाटले की, त्यांना मुंबईला बोलावण्यापेक्षा आपणच त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला हवे. म्हणून मी इथे आलो आणि या महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन केले.
- अमित ठाकरे, मनसे नेते