शहरी भागांत दरवर्षी ३०० कोटी लिटरहून अधिक पाण्याचे पुनर्भरण होईल असा अंदाज
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ॲमेझॉन इंडिया देशभरातील जलपुनर्भरण प्रकल्पांमध्ये ३७ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करीत आहे. या उपक्रमांमुळे दरवर्षी ३०० कोटी लिटरहून अधिक पाणी पुनर्संचयित होण्याची अपेक्षा आहे. याचा थेट फायदा पाणीटंचाई भासत असलेल्या भागांतील लोकांना होईल. या प्रकल्पांचा विस्तार बंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली आणि मुंबई या चार प्रमुख महानगरांपर्यंत झालेला आहे. २०२७पर्यंत भारतातील आपल्या थेट कामकाजात वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक पाणी स्थानिक समुदायांना परत देण्याच्या ‘ॲमेझॉन’च्या उद्दिष्टाला हे उपक्रम हातभार लावतील.
‘ॲमेझॉन’च्या जलउपक्रमांत बंगळुरूजवळील यमारे तलाव आणि हैदराबादजवळील साई रेड्डी तलाव यांचे पुनर्संचयनीकरण समाविष्ट आहे. हे काम सेट्रीज या संस्थेच्या सहकार्याने केले जात असून, त्यातून दरवर्षी सुमारे ५७ कोटी लिटर पाण्याची भर पडण्याचा अंदाज आहे. नवी दिल्लीमध्ये ‘हॅस्टन रिजनरेशन’सोबत यमुना नदीच्या जलसिंचनक्षेत्र पुनरुज्जीवन प्रकल्पावर ॲमेझॉन काम करत असून, त्यामुळे दरवर्षी आणखी ४० कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होण्याची क्षमता निर्माण होईल. या सर्व उपक्रमांमध्ये गाळ काढणे, बांध दुरुस्ती, पाण्याच्या प्रवेश व निर्गमनाच्या रचनांची फेरबांधणी, तसेच झिरपण खड्डे तयार करणे अशा उपायांचा अवलंब करून पाण्याचा साठा जास्तीत जास्त वाढवण्यावर भर दिला जात आहे. ‘ॲमेझॉन’च्या ‘एडब्ल्यूएस’ने भारतभरात महत्त्वाचे जलसंधारण प्रकल्प राबवले आहेत. यात भूजल पुनर्भरण आणि पावसाचे पाणी साठवणे (रेनवॉटर हार्वेस्टिंग) यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
वॉटरएड या संस्थेच्या सहकार्याने हैदराबाद आणि आंध्र प्रदेश येथे ते राबवले जात आहेत. या प्रकल्पांमुळे दरवर्षी सुमारे ६४ कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. ‘एडब्ल्यूएस’च्या ‘वॉटर डॉट ऑर्ग’सोबतच्या भागीदारीमुळे मुंबई आणि हैदराबाद परिसरातील स्वच्छ पाण्याचा सातत्याने पुरवठा नसलेल्या लोकांना दरवर्षी ५० कोटी लिटरहून अधिक पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच, सर्च या स्वयंसेवी संस्थेसोबतही एडब्ल्यूएस कार्यरत आहे. सर्च ही संस्था वंचित ग्रामीण समुदायांना त्यांचा सामाजिक- आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करते. या भागीदारीतून हैदराबादभोवतालच्या गावांतील शेतकऱ्यांना दरवर्षी ८.६ कोटी लिटर पाणी परत मिळण्याची सोय केली जात आहे.
Comments are closed.