नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहरातील मुख्य रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रिट केले जाणार आहेत. तशा आशयाचा निर्णय आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतला आहे. काँक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी अधिक खर्च होत असला तरी महापालिकेच्या आर्थिक स्थितीनुसारच रस्ते तयार केले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त डांबरी रस्त्यांवर जेथे खड्डे पडले आहे, तेथे काँक्रिटचे व्हाइट टॅपिंग केले जाणार आहे.
नाशिकमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. मागील पाच वर्षांत जवळपास बाराशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च झाले परंतु रस्त्यांची स्थिती मात्र सुधारत नाही. देयके हातात पडल्यानंतर ठेकेदार रस्त्याकडे ढुंकूनही बघत नाही. तात्पुरती दाखवून काम केल्याचे दर्शविले जाते. प्रत्यक्षात खड्डा ‘जैसे थे’ असतो. गेल्या दोन वर्षात नवीन रस्ते उखडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. विशेष करून पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर रस्ते खड्डे पुराण सुरू होते. त्यावर ठोस पर्याय निघत नाही. याच पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शहरातील रस्त्यांचा आढावा घेतल्यानंतर सोमवारी (ता.३१) बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर शहरातील मुख्य रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रिट करण्याचा निर्णय घेतला आहे.