नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवून आणला. याशिवाय अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावाही केला आहे. अजित पवारांच्या या बंडानंतर शरद पवार यांनी अजित पवार त्यांच्यासोबतचे 8 मंत्री झालेले आमदार, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचं पक्षातून निलंबन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे 9 आमदार, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला गेला. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या आमदारांवर तसेच प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या या बैठकीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगात याचिका आधीच दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे अजित पवार गटाने या बैठकीवर आक्षेप घेतला आहे.