नाशिक/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या द्वितीयोध्यायात राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. स्वाभाविकच जिल्ह्याती पक्षाच्या इतर आमदारांबाबत उत्सुकता निर्माण झाली. मात्र हे सर्व जन अजित पवार यांच्या सोबत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्यासह नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार आणि सरोज अहिरे असे सहा आमदार आहेत. यापैकी शपथविधीला तिघे जण उपस्थित होते, तर माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार मुंबईला तातडीने रवाना झाले होते. मात्र या सर्वजण अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात येते आहे. माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक असून त्यांची आमदारकीची चौथी टर्म आहे. झिरवाळ हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पहाटेच्या शपथविधीला देखील हजर होते. सध्या ते विधानसभा उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. निफाडचे दिलीप बनकर हे देखील राष्ट्रवादी पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. तेदेखील अजित पवार यांची पाठराखण करणार आहेत.
कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि देवळालीच्या आमदार सरोज आहिरे हेदेखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.