रायगड/एनजीएन नेटवर्क
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री दरड कोसळली. या गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेला आता अनेक तास उलटले आहेत. मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. खालापूर परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एनडीआरएफच्या बचाव पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखी इर्शाळवाडीत मदतकार्य करत आहेत. तसेच आज (दि. २०) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. शिंदे म्हणाले, बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत १०३ लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. तसेच या गावातील जे लोक कामानिमित्त बाहेर पडले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे. भातलावणीसारख्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आश्रमशाळेत जी मुलं आहेत, त्यांचीही माहिती घेतली जात आहे