NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

दादांचे ‘साहेबां’वर शरसंधान.. गौप्यस्फोट मालिकेनिशी केला घणाघात

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडल्यानंतर आज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या. पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची. अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच चार गौप्यस्फोट करत शरद पवारांविरोधात शरसंधान साधले.

शपथविधीला का पाठवले ?

२०१४ मध्ये आघाडीचे सरकार गेले आणि भाजपा, शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं होतं. जर त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला तिथे का पाठवलं? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

वर्षा बंगल्यावर बैठक

२०१७ मध्ये वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मी, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आम्ही सगळे राष्ट्रवादीतर्फे तर सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपातर्फे उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या दोघांमध्येही पाचवेळा बैठक झाली. आम्हाला सांगण्यात आलं की बाहेर काहीही बोलायचे नाही, असाही गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

सत्तेत सहभागाची विनंती

महाविकास आघाडीच्या काळातही भाजपासह सत्तेत सहभागी व्हायचं असतं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं. मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी एक ड्राफ्ट तयार केला. हसन मुश्रीफ यांनी ५३ विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. आपली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावे अशी विनंती आमदारांनी केली होती.

पवारांनी आमदाराला धमकावले

शरद पवार हे भावनिक होत कार्यकर्त्यांना, आमदारांना आवाहन करतात. एक आमदार होते मी त्यांचं नाव घेणार नाही. त्यांना शरद पवारांनी सांगितलं अजित पवारांसह जाऊ नकोस. तेव्हा त्या आमदाराने शरद पवारांपुढे हात जोडले आणि म्हणाले की मी अजित पवारांना शब्द दिला आहे. त्यावर त्याला तू निवडून कसा येतोस तेच मी बघतो अशी धमकी शरद पवार यांनी दिली होती. असाही गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.