मुंबई/एनजीएन नेटवर्क
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले होते. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात होता. अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचीच खरडपट्टी काढली आहे.
मुख्यमंत्री पद बदलावरून वक्तव्ये करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच खरडपट्टी काढल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच अजित पवारांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांनाही मुख्यमंत्री बदलाबाबत वक्तव्ये केल्याने झापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार यावरुन चर्चा सुरू होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांनी आणखी भर पडली होती. सरकारमध्ये सहभागी असताना अशा प्रकारची संभ्रम व्यक्त करणारी वक्तव्ये आल्याने अजित पवार नाराज झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांना इशारा दिला आहे.