मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली आहे. माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवे, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही दिले. यानंतर थोडीफार जुजबी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक संपली.
माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळणे आणि ‘शासन भिकारी आहे’ या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी कोकाटे यांना समज दिली.
शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनाही दादांचा सवाल ..
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. या कार्यकर्त्यांनी पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यावेळी अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना प्रतिसवाल केला. किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं? आता राजीनामा नको म्हणून आपण आलात. मात्र, ज्यावेळी मी स्वतःहून मंत्रिपद दिलं त्यावेळी कुणीही आले नव्हते. सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याचे समजते.
Comments are closed.