मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर कारवाई करायला सुरूवात होत आहे. जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पदमुक्त केले आहे, तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे.
दरम्यान शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांचे निलंबन केल्याचे जाहीर केले होते, पण आपण एक दिवस आधीच सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी थेट जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरच कारवाईसाठी पावले उचलली आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विधिमंडळ नेता म्हणून निवडले आहे, त्यामुळे मी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्याबाबत कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
‘एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून नेमलं गेलं आहे अशी बातमी मी वाचली. विधिमंडळामध्ये मी बरीच वर्ष काम केलं आहे. विरोधी पक्षनेता नेमायचं काम हे विधानसभा अध्यक्षाचं असतं. अधिवेशन सुरू असताना विधानसभा अध्यक्ष सत्तेत नसलेल्या पक्षामध्ये ज्याची संख्या जास्त असते त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करतात. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी, यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याला काही अर्थ नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला.