- ‘निमा’च्या सततच्या पाठपुराव्याचे फलित असल्याचा दावा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू व विस्तारीकरणाचा शुभारंभ हे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि विविध औद्योगिक-व्यापारी संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे फलित असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मुंबई आणि पुणे येथे पूर्ती झाली असून आता नाशिक हेच त्यादृष्टीने महत्त्वाचे एकमेव स्थळ असल्याने ओझर विमानतळाचा विस्तार करावा, मुंबई विमानतळाचा भार हलका करण्यास नाईट लँडिंगची सुविधा नाशकात उपलब्ध करावी, आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन या ठिकाणी भाविकांच्या ओघ वाढणार असल्याने टर्मिनल इमारतीचे विस्तारीकरण करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या वाढवाव्यात आदी आशयाचे निवेदन निमातर्फे संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते.
निमाचे पदाधिकारी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यादृष्टीने सातत्याने पाठपुरावाही केला. अखेर त्याचे फलित म्हणून महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले याचा आम्हाला आनंद आहे असे नहार यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की तो ते पाळतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कार्गो वाहतुकीबाबत नाशिक विमानतळ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे ही सुद्धा नाशिककरांच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचेही नहार यांनी निदर्शनास आणले.
यावेळी निमा अध्यक्ष आशिष नहार व उपाध्यक्ष आणि एविएशन कमिटी अध्यक्ष मनीष रावल यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निमाच्या वतीने लवकरच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली.
उद्योग व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर व HAL चे पदाधिकारी सदर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.
Comments are closed.