NGN News
Latest Marathi News

पिकविमा भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा

कंपनी प्रतिनिधींनी नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण न केल्याने 200 शेतकरी मदतीपासून वंचित

शशिकांत बिरारी

कंधाणे : कंधाणे येथील खरीप व रब्बी 2024 हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली असताना सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पिक पंचनामा न केल्याने 200 शेतकरी आपल्या हक्काच्या पिकविमा भरपाई पासून वंचित राहिले आहेत.यावर तात्काळ कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक 25 पासून तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की गावातील 200 शे हुन अधिक शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी 2024 मधील नुकसानीची तक्रार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांक वर 72 तासांच्या आत नोंदवली होती. त्याबाबतचा तक्रार क्रमांकही शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून पिक विमा कंपनीने गावातील मोजक्याच शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना पिक विमा मंजूर केला. मात्र 72 तासांच्या आत तक्रार नोंद दिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणति ही दखल घेतली गेली नाही. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे येत्या आठ दिवसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने पिकविमा रक्कम न दिल्यास कृषी विभाग व पिक विमा कंपनी विरोधात सोमवारपासून कंधाणे येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या वंचित शेतकऱ्यांनी दिला आहे. या शेतकऱ्यांच्या जिविताची सर्वस्वी जबाबदारी वरील इन्शुरन्स फायनान्स कंपनीची राहील असेही निवेदनात शेवटी नमूद केले आहे. निवेदनावर शेतकरी बाळासाहेब बिरारी, किरण पाटील, दिलीप बिरारी, मनोहर बिरारी, कारभारी बिरारी ,भाऊसाहेब बिरारी, सुभाष बिरारी ,भाऊराव बिरारी, बाळू बिरारी, ब गिरीधर बिरारी ,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
… प्रतिक्रिया…
आम्ही 2024 साला करिता खरीप व रब्बी हंगामात पंतप्रधान पिकविमा काढला होता.खरीप हंगामात परतीच्या पावसाने व रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते.नुकसान झालेल्या क्षेत्रातील पिंकाची तक्रार 72 तासांच्या आत कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांक वर नोंदवली होती.पण कंपनीने त्यांच्या प्रतिनिधींन मार्फत नुकसान ग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा न केल्याने आम्ही पिकविमा रक्कमे पासून वंचित राहिलो आहोत.आठ दिवसांत पिक विमा रक्कम न दिल्यास उपोषणास बसणार आहोत.
…. बाळासाहेब बिरारी
माजी संचालक, वसाका

Comments are closed.