मुंबई/एनजीएन नेटवर्क
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची अचानक भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. पण शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी अजितदादा गटाकडे मांडल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवारांना साकडे घालणे सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडलेत. अजित पवारांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते शंभर रुपयांच्या बॉण्डवर लिहून देतायेत. दुसरीकडे मात्र वेगळ्याच घडामोडी घडत असल्याने कार्यकर्ते ही बुचकळ्यात पडलेत. पण पवार कुटुंब एकत्र आलं तर आमच्यावरही अशी वेळ येणार नाही, असं ते म्हणतायेत.