NGN News
Latest Marathi News

कोलकाता, गुवाहाटीनंतर लासलगावहून ८४० टन कांदा चेन्नईला रवाना

केवळ २४ रुपये किलो दराने विक्री होणार; निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना

लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारच्या वतीने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा कांदा केवळ २४ रुपये किलो दराने विक्रीसाठी आणला जात आहे. कोलकाता, गुवाहाटीनंतर रविवारी लासलगाव येथून तब्बल ८४० टन कांद्याचा २१ डब्यांचा रेल्वे रेक चेन्नईकडे रवाना करण्यात आला. मागील आठवड्यात कोलकत्ता, गुवाहटी आणि यानंतर आता चेन्नई साठी 840 टन कांदा रवाना करण्यात आल्याने शहरी ग्राहकांना दिलासा तर शेतकरी वर्गाचे मात्र कंबरडे मोडले जात आहे

मात्र, या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरून १००० ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले असून उत्पादन खर्चदेखील परत मिळत नाही. शेतकरी १० ते १५ रुपये किलो तोट्याने कांदा विकला जात आहेत.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, “ग्राहकांना दिलासा मिळतोय हे योग्य आहे. पण शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर मुंबई आणि दिल्ली येथे मंत्रालयांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

शेतकरी रामभाऊ भोसले यांनी हळहळ व्यक्त केली की, “सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात येताच दर आणखी पडले. उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी हतबल झाले आहेत.” ग्राहकांच्या ताटात स्वस्त कांदा पोहोचत असला तरी शेतकऱ्यांचा घामाने पिकवलेला माल तोट्यात जात आहे. 

Comments are closed.