नाशिक/एनजीएन नेटवर्क
इंदूरस्थित शुक्ल यजुर्वेदीय याज्ञवल्क्य संस्थेतर्फे शुयमा ब्राह्मण संस्था नाशिकचे कार्यवाह तथा नाशिक शहर बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष अॅड भानुदास शौचे यांना सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र सन्माननिधी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कार प.पू. बाबासाहेब उपाख्य प्रदीप तराणेकर, इंदूर संस्था अध्यक्ष पं. उपेंद्र जोशी, वे.मू. अनंत लावर गुरुजी आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री शुक्ल यजुर्वेद संहिता स्वाहाकार’ सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प पू बाबा महाराज तराणेकर यांनी, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना सर्वाना सोबत घेऊन जाणे हा अॅड भानुदास शौचे यांचा विशेष गुण कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी आयोजित व्याख्यानात बोलताना अॅड भानुदास शौचे यांनी सांगितले की, आधुनिक युग स्पर्धेचे युग आहे. या युगात स्वयंसिद्धतेसाठी नावीन्य, विशेष कौशल्ययुक्त ज्ञान असणे अपरिहार्य ठरते. यासाठी महर्षी याज्ञवल्क्य यांचेकडून प्रेरणा मिळते. महर्षी याज्ञवल्क्य यांनी आपल्या दोन गुरूंकडून घेतलेली विद्या मतभेदांमुळे त्यांना परत केली. तद्नंतर सूर्योपासना करून सुर्याकडून वेद मिळवले. त्याचे चार भाग करून शिष्य-प्रशिष्यद्वारे वेदांचा प्रसार केला. त्यामुळे ‘निर्मितीची क्षमता त्याचे नाव याज्ञवल्क्य’ अशी प्रेरणा मिळते.
ब्राह्मण समाज ऐक्याबाबत अॅड शौचे म्हणाले, समाज विकास तसेच त्याच्या सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी शाखाभेदरहित ऐक्य आणि संघटन ही काळाची गरज आहे. ब्राह्मण समाजाने इतर समस्त समाजात साखर होऊन राहावे. समस्त विश्वाचे कल्याण व्हावे हीच ब्राह्मणाची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि समस्त समाजासोबत रहाण्याची वृत्ती यामुळेच ब्राह्मण समाज सतत प्रगती करीत राहील. ब्राह्मण समाजाने समस्त समाजासोबत मिळून मिसळून रहाणे आवश्यक आहे.
सदर सोहळ्याप्रसंगी श्री शुक्ल यजुर्वेदीय याज्ञवल्क्य संस्था इंदूर तसेच श्री नानामहाराज तराणेकर संस्थान आणि श्री गणेश मंडळ या संस्थांचे पदाधिकारी, गुरुजन तसेच सौ आईसाहेब तराणेकर भागवताचार्य नंदकुमार लासुरकर, ( गुरुदेव नंदू महाराज ) पं तुषार जोशी, वेशासं धनंजय जोशी, दांडेकर, सौ स्वाती जोशी लासुरकर, निखिल पाठक, विविध संस्थांचे पदाधिकारी, गुरुजन तसेच समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.