
** एनजीएन न्यूज नेटवर्क
येवला : शिक्षणव्यवस्था व प्रशासकीय क्षेत्रातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासकीय सेवांसाठी संवेदनशील अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने आयोजित एकदिवसीय ‘प्रशासकीय दृष्टीकोन मार्गदर्शन शिबिर’ १५ मार्च रोजी येवला येथे उत्साहात पार पडले.
कॉम्रेड रणजीत परदेशी व कॉम्रेड सरोजिनी कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चेतना अकादमी आणि मार्क्सवाद–फुले–आंबेडकरवाद को-ऑर्डिनेशन (लोकशाहीवादी) कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतीज्योती निवास’, पाबळे वस्ती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या मुख्य सत्रात ‘पोलीस व प्रशासनाचा मानवी चेहरा’ या विषयावर मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. संवेदनशील व जागरूक तरुण प्रशासनात आल्यास समाज परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो. त्यामुळे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी युवकांनी प्रशासकीय सेवेत येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
रायगड येथील सामाजिक कार्यकर्त्या व विद्यार्थी समुपदेशक स्नेहा कर्णिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षांमधील सध्याची आव्हाने, आरक्षणाचे प्रश्न आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचा संघर्ष यावर प्रकाश टाकला. ही स्पर्धा केवळ करिअरपुरती मर्यादित नसून स्वाभिमानाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या शिबिरात नाशिक, पुणे, धुळे जिल्ह्यांसह विविध भागांतील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि शेतकरी कुटुंबातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सरकारी नोकरभरतीच्या प्रश्नांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामीण भागातील युवकांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, हा शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्राने झाली. यावेळी डॉ. रमेश पाटील, डॉ. सायली जगताप, प्रा. मोहन जंगले, अॅड. विजय निकम, प्रा. मढवई, प्रा. निर्मळ, संतोष अहीरे, विकास गवई यांच्यासह अभ्यासक, संवेदनशील प्रशासक व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.