- आदिवासींचे प्रश्न सोडवणुकीसाठी रस्त्यावरची लढाई अपरिहार्य
- सुरगाणा तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा
सुरगाणा : वाजीद शेख
आदिवासींचे प्रश्न सोडवायचे असतील तर रस्त्यावरची लढाई शिवाय पर्याय नाही. जल, जंगल, जमीनीवर आदिवासींचाच हक्क आहे. तो आज सरकार हिरावून घेऊ पहात आहे. तो मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे असे आवाहन जागतिक आदिवासी दिना निमित्ताने सुरगाणा शहरातील कार्यक्रमात माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले.
ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुर्वी पहिली लढाई आदिवासी क्रांतिकारकानी लढली आहे. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, तंट्या मामा या सारख्या क्रांतिकारकानी जल, जंगल, जमीनीचे संरक्षण करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आज आदिवासी समाजावर आली आहे.अन्याय, अत्याचार सहन न करता संघर्ष करण्याची गरज आहे. त्याच बरोबर शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही.युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे.आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचण्याची जिद्द बाळगली तरच खरा विकास आदिवासींचा होणार आहे.तरुणांनी व्यसनापासून दूर राहून स्वतःची प्रगती करावी, तसेच आदिवासी कला, संस्कृती, परंपरा, चांगल्या चालीरीती, पेहराव, बोलीभाषा, वाद्य आदींची जपणूक करायला हवी असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील उंबरठाण, बा-हे, पळसन, खुंटविहीर, खोबळा, बोरगाव,सुरगाणा शहरात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये पारंपरिक कला, संस्कृतीचे दर्शन घडवित बोहाडा नृत्य, जहाज नृत्य, पावरी, ढोल, ठाकर नृत्य, सिंह नृत्य, डांगी नृत्य, तुर, मांदोळ नृत्य सादर करण्यात आले. आदिवासी पोशाख परिधान करीत महिला, पुरुष , तरुण, युवती यांनी सहभाग घेतला होता.विविध नृत्य कलाकारांनी सहभाग घेत प्रेक्षकांची मने जिंकली. तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, सहभागी झाले होते.आदिवासी समाज सेवक चिंतामण गावित, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, भरत पवार, परशुराम गावित, सुभाष चौधरी, विजय घांगळे, एल. के. बागुल, रतन चौधरी, परशुराम पाडवी आदी सहभागी झाले होते.
Comments are closed.