कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप
** एनजीएन नेटवर्क
डांगसौंदाणे/निलेश गौतम
शासन एकीकडे गरोदर महिला, प्रसुती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असतांना ग्रामीण भागात मात्र आरोग्य यंत्रणेचे शिलेदारच या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत. असाच एक संतापजनक प्रकार बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आला आहे.
कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विरेंद्र आवारे यांनी मंगळवार (दि. 22) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी आलेल्या कल्पना भोये (रा .खडकी ता. कळवण) या महिलेला रुग्णालयात दाखल न करून घेता सरळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यावेळी या महिलेचे वडील काकजी बागुल (रा. कपालेश्वर) आणि नातेवाईकांनी डॉ आवारे यांना विंनती केली असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्याने व सोबत असलेल्या एका मित्राने या कुटुंबियाला अक्षरशः हुसकावून लावले. या कुटुंबाने तात्काळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय गाठत संबंधित महिलेची प्रसुती केली. दुसऱ्या दिवशी संबंधित कुटूंबियाने गावातील प्रमुख लोकांसह परिसरातील लोकप्रतिनिधींना घेत थेट कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. या वेळी रुग्णालयात हजर असलेले डॉ आवारी हे परत मद्यच्या नशेत आढळून आल्याने आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदा काकुळते व स्थानिक आदिवासी जनतेने या नशेबाज वैद्यकीय अधिकारीला रुग्णालयातून अक्षरशः हुसकावून लावले.
गेली अनेक वर्षे या रुग्णालयात असलेले डॉ आवारी हे कायमच मद्येच्या नशेत राहत असल्याने अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाते तर दुसरे नेमणुक असलेली वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेशवर धनगे-पाटील ही कायम राहत नसल्याने रुग्ण सेवेचा तूर्त फज्जा उडाला असल्याने आज संताप अनावर झालेल्या कपालेश्वर ग्रामस्थांनी थेट जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर माहिती देत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली व या रुग्णालयात पूर्णवेळ नवीन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी केली आहे .पश्चिम भागातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र हे या भागातील पंधरा ते वीस गावांसाठी महत्त्वाचे रुग्णालय असून या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने अनेक वेळा संबंधितांना कळवुन ही आरोग्य सेवा सुधारत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे .संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कपालेश्वरचे सरपंच मनोहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश महाले, पोपट पवार, साहेबराव अहिरे, केशरबाई बागुल, उत्तम बागुल, तुषार बागुल, माधव ठाकरे, लहानू पवार, रूपाली बागुल आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.
- संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची सततची तक्रार लक्ष्यात घेता त्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णाची यापुढे हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्यात येईल* तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल महाजन *कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या आदिवासी भागासाठी शोभेची वास्तू ठरत आहे आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनतेत नाराजी आहे .येथील वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीने येतात आणि जातात वरिष्ठांनी लक्ष न दिल्यास आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- – मनोहर ठाकरे, सरपंच कपालेश्वर